नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करावी- आ.शहाजीबापू पाटील

सांगोला तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या पिकांचे तसेच अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी राहत्या घरांचे छत व पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त पिकांचे व घरांचे त्वरित पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी. पावसामुळे केळी, डाळिंब, आंबा या फळबागांचे व शेतकऱ्यांच्या घराचे, लाईट पोलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच अनेक शेतकरी आपली पिके जगवण्यासाठी संघर्ष करत होते.

वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. महावितरण कार्यालयाने तात्काळ विजेचे खांब पूर्ववत उभे करून वीज पुरवठा सुरळीत करावा अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच वीज पडल्याने अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे.

अशा परिस्थितीत शेतकरी, नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी महसूल विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून असा अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर करून नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या फळबागा व पिकांचे महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करावेत.

नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नागरिकांना तात्काळ मदत देण्याच्या दृष्टीने महसूल प्रशासनाने पंचनामे करून मदत देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले आहे.