सांगोल्यातून शिवसेनेनेही थोपटले दंड! देशमुख बंधूंची वाढली चिंता….

सांगोला ही शिवसेनेची पारंपारिक जागा आहे. त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेना विधानसभेची निवडणूक लढविणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आम्ही लवकरच शिष्टमंडळासह भेट घेणार आहे. आमचा उमेदवारही तयार आहे, असल्याचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही सांगोला मतदारसंघातून विधानसेसाठी शड्डू ठोकला आहे, त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे इच्छूक डॉ. बाबासाहेब आणि अनिकेत या देशमुख बंधूंचे टेन्शन वाढणार आहे.कारण मागील निवडणुकीत ही जागा शिवसेनेने लढवली होती, त्यामुळे आमचा सांगोल्यावर दावा आहे, असे शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी जाहीर केले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांची आज सांगोल्यात पत्रकार परिषद झाली. त्या परिषदेत शिंदे यांनी सांगोल्यातून आम्ही विधानसभेची आगामी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

मागील निवडणुकीत शहाजी पाटील यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होत. त्या वेळी शिवसेना एकत्र होती. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर शहाजी पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले, त्यामुळे महायुतीकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत शेकापने महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता. त्यामुळे विधानसभेला सांगोल्याची जागा महाविकास आघाडीकडून शेकापला सोडली जाईल, अशी धारणा असताना आता शिवसेनेनेही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे.शिवसेनेच्या नव्या पवित्र्यामुळे महाविकास आघाडीतही मतदारसंघावरून धूसफूस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनीही निवडणुकीची तयारी चालवली आहे, त्यामुळे महायुतीप्रमाणे आता महाविकास आघाडीत शिवसेनेच्या भूमिकेमुळे पेच निर्माण होऊ शकतो.