पानसरे हत्या प्रकरणाला वेगळं वळण; संशयित फरार 

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खुनातील संशयित फरार विनय पवार याचे गोव्यातील आश्रमात एकत्रित काढलेले छायाचित्र पत्नी श्रद्धाने पुणे राज्य गुन्हे अन्वेषण शाखेत छायाचित्र हजर केले होते. ते पंच साक्षीदाराने न्यायालयात ओळखले, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली.

आजच्या सुनावणीत पंच साक्षीदाराचा सरतपास आणि उलटतपास झाला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या समोरही सुनावणी झाली. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खुनानंतर तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा तपास करीत होते. ते पुण्यातील सीआयडी कार्यालयात तपासात होते.

तेव्हा खुनातील तीन क्रमांकाचा संशयित फरार विनय पवार यांच्या पत्नीने आश्रमात काढलेले दोघांचे छायाचित्र हजर केले. ते छायाचित्र गोव्यातील आश्रमात २००८ मध्ये श्रद्धा आणि विनय पवार यांनी गुरुपौर्णिमेवेळी एकत्रित छायाचित्र काढले होते, असेही तिने सांगितले. पत्नी श्रद्धा उंब्रजमधील असून, विनय पवार हे पती असल्याचा पुरावा म्हणून तिने स्वतः हे छायाचित्र हजर केले. त्यावेळी तेथे पंच साक्षीदार हजर होता. त्याने तेच छायाचित्र आज न्यायालयात सरतपासात ओळखले.