कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना आणखी पुराचा विळखा बसण्याची भिती! कर्नाटक सरकार वाढवणार अलमट्टीची उंची…..

अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्यासाठी राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेत असल्याचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी सांगितले. दरम्यान यावरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा आणखी धोका वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यावर जिल्ह्यातील काही संघटनांनी आवाज उठवला आहे.कर्नाटक सरकार जर अलमट्टी धरणाच्या उंचीवरून आग्रही असेल तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील मिळून जवळपास २०० गावांना मोठा फटका बसणार आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर बाधित गावे ऊस पट्टा क्षेत्र म्हणून ओळखली जातात. अलमट्टीची उंची वाढल्यास हा धोका आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

२००५, २०१९, २०२१ आणि २०२४ या वर्षांमध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना अलमट्टीच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे फटका बसला आहे. सांगली शहराच्या प्रमुख भागात कृष्णा नदीचे पाणी येते तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील ४३ गावांना कृष्णेच्या पाण्याचा विळखा बसतो.