कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हा तिघाही खासदारांना पक्ष गट तट बाजूला ठेवून एकत्रीत काम करावे लागेल, कोणत्या कामासाठी प्राधान्य द्यायचे ते सर्वांनी एकमताने ठरवावे लागेल.जिल्ह्यातील जनतेच्या आपल्याकडून असलेल्या आशा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठीही नियोजन बद्ध काम करावे लागेल, असे परखड मत काँग्रेसचे नूतन खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केला. ते शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन स्मँकच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी बोलत होते.
यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.ते पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी कोणाचेही दुमत असायचे कारण नाही. पण प्राधान्य कोणत्या कामाला द्यायला पाहिजे, ते सर्वांना विश्वासात घेऊन ठरवले पाहिजे. तसेच विकास कामांचे वेळापत्रक असले पाहिजे. ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या बजेटमध्ये कामे पूर्ण झाली पाहिजेत. अन्यथा कामे रेंगाळणे, बजेट वाढणे, अशा कारणांमुळे विकासाला खीळ बसू शकते. जिल्ह्याच्या विकास कामासाठी चलन पुरवठाही तितकाच आवश्यक आहे.
याकरिता आम्ही तिघे खासदार केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करू. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांना जनतेने एक धडा शिकवला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांना एकतर्फी निर्णय न घेता सर्वांना विश्वासात घेऊनच काम करावे लागणार आहे. सध्या प्रदुषणाचा विषय गंभीर बनत चालला आहे. त्याकरिता सर्वच घटकाने योग्य ते उपाय योजना व अंमलबजावणी केली पाहिजे, असे आवाहनही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले.