सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रशासनाने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात. तसेच दुष्काळग्रस्त जत, आटपाडी तालुक्यांत टँकर सुरू असूनही तिथे पुरेशा खेपा होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामाेरे जावे लागत आहे.
म्हणून सर्व टँकरना प्रशासनाने जीपीएस सिस्टम तातडीने बसवावी, अशी मागणी ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची प्रकाश शेंडगे यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर भेट घेतली. त्यानंतर शेंडगे बोलत होते. ते म्हणाले, जत तालुक्यातील ७३ गावांमध्ये दुष्काळ आहे. या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी तो नियमाप्रमाणे होत नाही. टँकर कोठे भरला, कोठे खाली केला याची माहिती मिळावी, यासाठी टँकरला जीपीएस सिस्टम बसवावी, अशी मागणी केली.
जर मंजूर नियमाप्रमाणे टँकर पुरवले जात नसतील तर तेथील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. प्रशासनाने लक्ष घालून नागरिकांना पाणीटंचाईपासून दिलासा देण्याची गरज आहे. मोठ्या जनावरांसह शेळी, मेंढीसाठी विशेष चारा छावण्या मंजूर करण्यात याव्यात. पशुधनाचे चारा नसल्यामुळे मोठे हाल होत आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी धनाजी गडदे, प्रा. कृष्णा आलदर, प्रशांत लेंगरे, अमोल ओलेकर, सुमन माळी, आदी उपस्थित होते.