चांदोली धरणातून विसर्ग झाल्यानंतर पाण्याचे नमुने घेत चौकशी सुरू

चांदोली धरणातून (Chandoli Dam) पाण्याचा विसर्ग सुरू झाला आणि इकडे चिकुर्डे बंधाऱ्यावर मृत माशांचा थर दिसू लागला.चांदोली धरण ते चिकुर्डे बंधारा या दरम्यानच्या पट्ट्यात पाण्यात नेमके काय मिसळले, यावर आता चौकशी सुरू झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सांगली कार्यालयाने (Maharashtra Pollution Control Board Sangli) पाण्याचे नमुने घेतले आहेत.

सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून काही गडबड झालेली नाही, कोल्हापूरच्या हद्दीत शोध घ्यावा, असा प्राथमिक अहवाल विभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडल्यानंतर रात्रीच्या अंधारात गडबड करण्याची जुनी पद्धत आहे. माशांचा मृत्यू होऊन पाण्यावर तरंगू लागल्यानंतर ती लक्षात येते.

मात्र मुळापर्यंत यंत्रणा पोहोचत नाही, असा अनुभव आहे. मासे कशाने मेले, हे शेवटपर्यंत कळत नाही.म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्याची मागणी जोर धरते आहे. चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सातत्याने पाणी सुरू राहील. या लोंढ्यासोबत काही रसायनयुक्त पाणी नदीत सोडले आहे का, याबद्दल शंका उपस्थित करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने चिकुर्डे ते समडोळी या टप्प्यात जागोजागी पाण्याचे नमुने घेतले आहेत.

वारणा नदीतील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीला पाठवले आहे. प्रथमदर्शनी जिल्ह्याच्या हद्दीतील उद्योगधंद्यातून पाणी सोडले गेले नसल्याचे दिसते.