भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्या चालकांना वेसण घालण्यासाठी, तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून रस्त्यांवर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवण्यात येत असतात. मात्र हेच स्पीड ब्रेकर आता वाहन चालकांच्या जीवावर उठत आहेत. सदोष आणि अशास्त्रीय पद्धतीने उभारण्यात आलेले स्पीड ब्रेकर वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत असल्याचे समोर आलं आहे. स्पीड ब्रेकर तयार करताना लांबी, रुंदी, उतार, उंचवटा या कोणत्याही निकषाचे पालन होत नसल्याचे अनेकदा पुढे आले आहे. अशातच आता सांगलीत एका तरुणाचा स्पीड ब्रेकरमुळे जीव गेला आहे.
सांगली शहरामध्ये स्पीड ब्रेकरमुळे अपघात होऊन दुचाकीस्वर ठार झाल्याची घटना घडली आहे. विजय मगदूम असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. सांगली शहरातल्या बिरनाळे कॉलेज परिसरामध्ये हा अपघात घडला आहे. हा अपघाताचा थरार तिथल्या एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ आता समोर आला आहे.
सांगली शहरातले सामाजिक कार्यकर्ते विजय मगदूम हे रात्री आपल्या घरी निघाले होते. बिरनाळे कॉलेज परिसरामध्ये असलेल्या रस्त्यावरील असणाऱ्या स्पीड ब्रेकरमुळे गाडी घसरून पडल्याने विजय मगदूम हे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच विजय मगदूम यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सांगली शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ-मोठे स्पीड बेकर असल्याने वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे आता विजय मगदूम यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे स्पीड ब्रेकरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.