लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला वरुणराजाने हजेरी लावली आणि विजयी उमेदवारांचा आनंद द्विगुणित केला. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी पावसातही आनंदोत्सव साजरा केला. मान्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटकच्या आणखी काही भागात, गोव्यात दाखल झाला आहे. दोन दिवसांमध्ये हा मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा भागात पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
कोकणातील जिल्ह्यांना पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यात पुढील पाच दिवस औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, लातूर, नांदेड, जालना, परभणी येथे तुरळक ठिकाणी पाऊस होईल. विदर्भातही सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.