भारतीय संघ टी-20 विश्वचषक 2024 चा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. हा सामना आज न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. हा सामना स्थानिक म्हणजेच न्यूयॉर्कच्या वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल, तर भारतात हा सामना रात्री 8 वाजल्यापासून पाहायला मिळेल. या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इल्वेहन कशी असेल, याबाबत उस्तुकता लागली आहे.
कर्णधार रोहित शर्मासोबत विराट कोहली सलामीला येऊ शकतो. यशस्वी जैस्वाल संघात मुख्य सलामीवीर म्हणून खेळत असला तरी, विराट कोहलीला संधी दिली जाऊ शकते. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात संजू सॅमसन रोहित शर्मासोबत सलामीला मैदानात उतरला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियामध्ये, दोन्ही यष्टीरक्षक म्हणजेच ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना आयर्लंडविरुद्ध संधी मिळू शकते.
ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर, तर संजू सॅमसनला पाचव्या क्रमांकावर संधी मिळू शकते. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगसह हार्दिक पांड्या तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून संघात असेल. अशा स्थितीत रोहित शर्माला तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरवण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल हे प्रमुख फिरकीपटू असू शकतात आणि रवींद्र जडेजा अष्टपैलू म्हणून तिसरा फिरकी गोलंदाज संघात असेल.