लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे महायुतीत खळबळ उडालेली आहे. त्यामुळे महायुतीचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. या आमदारांना पक्षप्रवेश द्यायचा की नाही हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता शिंदे गटाकडूनही मोठा दावा केला आहे. शिंदे गटाचे ठाण्यातील नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी एक मोठा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार आलं आहे. आमच्या सरकारला पूर्ण बहुमत आहे. हे सरकार पाच वर्ष व्यवस्थित कारभार करेल, असं सांगतानाच उद्धव ठाकरे यांच्या गटाचे दोन खासदार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. म्हस्के यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. ठाकरे गटात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. तर दुसरीकडे मोदींना कोणते दोन खासदार पाठिंबा देणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
ठाकरे गटातून निवडून आलेल्या दोन खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क साधला आहे. दोन खासदार आले तर ते अपात्र होऊ शकतात. त्यामुळे खासदारांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. किमान उबाठा गटातून 9 खासदार येणं आवश्यक आहे. तर अपात्रतेचा निकष लागू शकणार नाही. तशीही सहा जणांची गरज आहे. अपात्रतेवर मार्ग काढण्याची गरज आहे, असं नरेश म्हस्के मीडियाशी बोलताना म्हणाले.