कोल्हापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, तीन दिवस ऑरेंज अलर्ट!

कोल्हापूर शहरासह कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी (8 जून) सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर झालेल्या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला असला, तरी काही ठिकाणी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर केलेल्या पेरण्या जोरदार पावसाने वाहून गेल्या आहेत.

शनिवारी संध्याकाळी झालेल्या तुफानी पावसामुळे काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पावसाची नोंद झाली. दरम्यान, हवामान विभागाकडून पुढील तीन दिवसांसाठी कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कागल तालुक्यातील हणबरवाडीमध्ये जोरदार पावसाने एक रेडकू आणि दोन शेळ्या ओढ्याच्या पाण्यातून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली.