राज्य सरकारकडून राबवण्यात आलेल्या आनंदाचा शिधा योजनेची कोल्हापूर जिल्ह्यात लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. अद्यापही रेशन दुकानदारांपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचलेला नाही.जिल्हा पुरवठा विभागाकडे तेल उपलब्ध नसल्याने आनंदाचा शिधा वाटप रखडले आहे.
याबाबत राधानगरी तालुका पुरवठा अधिकारी पोवार यांच्याशी संपर्क साधल्यास ते म्हणाले, पुरवठा विभागामध्ये ‘आनंदाचा शिधा’मधील तेल वगळता इतर सर्व साहित्य उपलब्ध आहे. तेलाची मागणी केली आहे.
ते उपलब्ध होताच ‘आनंदाचा शिधा’चे वाटप केले जाईल अशी माहिती पोवार यांनी दिली.गणेशोत्सवात आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, शिधा सामग्री अद्याप पोहोचलेली नसल्याने लाभार्थ्यांना यापासून वंचित राहावे लागले.
यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.तालुका पुरवठा विभागाकडे आनंदाच्या शिधामधील तेल वगळता इतर साहित्य पोहोचले आहे. परंतु, तेलाचा पुरवठा न झाल्याने आनंदाचा शिधा वाटप रखडले आहे. त्याचा लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गोरगरीब लाभार्थ्यांमध्ये सरकारच्या कारभाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.