मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून सतत लढा देणारे मनोज जरांगे हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नसून सर्वत्र त्यांची ओळख पसरली आहे. याच मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.’संघर्षयोद्धा’ हा सिनेमा आज म्हणजेच 14 जूनला प्रदर्शित होणार असून आज दुपारी 12.15 वाजल्यापासून राज्यातील सर्व थिएटर्समध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ असे चित्रपटाचे नाव असून त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.
जरांगे यांच्या जीवन व आजवरच्या संघर्षवर हा चित्रपट असून चित्रपट हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता असून चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याही भूमिका दाखवण्यात आल्या आहेत. या सिनेमात छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी यांनी केली आहे.
तर दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका साकारली आहे. शिवाजी दोलताडे यांनीच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी देखील निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे.