आषाढी वारी तोंडावर आलेली असतानाच सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी पालखी मार्ग, पालखी तळ आदींच्या सोयी सुविधांची पाहणी केली होती. परंतु, चंद्रभागा वाळवंट व नदीची पाहणी केली नसल्याने आम्ही चंद्रभागेची पाहणी करावी अशी मागणी केली होती.अखेर जिल्हाधिकारी यांनी चंद्रभागा व वाळवंटाची पाहणी केली. यावेळी आम्ही त्यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चाही केली, अशी माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.
आषाढी वारी तोंडावर आलेली असतानाच चंद्रभागेतील अवैध वाळु उपशामुळे पडलेले खड्डे बुजवणे, चंद्रभागा वाळवंटाची स्वच्छता होणे, अवैध वाळु उपसा रोखणे, नदीत मिसळणारे ड्रेनेजचे पाणी थांबवणे आदी विविध कामे तातडीने करणं गरजेचं असतानाही पंढरपुरातील महसुल अधिकारी अवैध वाळु उपशाला अभय देतात, मुख्याधिकारी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात, वाळु उपशामुळे पडलेले खड्डे बुजवत नाहीत, त्यामुळे भाविकांच्या जीविताला धोका निर्माण होतो, तसेच पंढरपूर नगरपरिषदेच्या जुन्या पुरातन इमारतीवर झाडे झुडपे उगवली असुन यामुळे पंढरपुरचे पुरातन वैभव असलेल्या या इमारतीला धोका निर्माण झाला आहे.
अशा विविध प्रश्नांकडं जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचे लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न केला.आमच्या आदिवासी कोळी समाजाचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या चंद्रभागेतील स्मारकाच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भातही चर्चा झाली असुन पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. आपल्या समोर अधिकारी हे प्रश्न सोडवु, असे आश्वासन देतात. मात्र, नंतर याकडं सपशेल दुर्लक्ष करतात अशी तक्रारही आपण जिल्हाधिकारी यांच्याकडं केली असल्याची माहिती गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.