सोलापूर येथील मोदी स्मशानभूमीत दोन दिवसांपूर्वी दफन केलेल्या दहा महिन्यांच्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याची घटना तिसर्या दिवशीच्या विधीदिवशी घडली. त्यामुळे रविवारी शहरात एकच खळबळ उडाली.सदर बझार पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून तपास सुरू केला आहे.
प्रियांश वाघमारे असे मृत बाळाचे नाव आहे. प्रियांशचा मृतदेह गायब झाल्याने त्याच्या पालकांना जबर धक्का बसला आहे. दरम्यान, अशा घटनांमुळे स्मशानभूमीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोदी येथील स्मशानभूमीत सुरक्षा रक्षक नाहीत, कॅमेरे असणे गरजेचे असल्याची मागणी वाघमारे कुटुंबीयाकडून करण्यात आली आहे. प्रियांश वाघमारे याला डोक्याला मार लागल्यामुळे सोलापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेे होते. मात्र ,उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर दुपारी अडीचच्या सुमारास मोदी येथील स्मशानभूमीत त्यास दफनविधी करण्यात आले होते. कोणतेही जनावर उकरू नये म्हणून त्यावर फरशी, दगड, काटेरी फांद्या ठेवण्यात आल्या होत्या.
तिसर्या दिवशीचा विधी करण्यासाठी प्रियांशचे वडील, आजी आजोबा वाघमारे कुटुंबीय आज रविवारी सकाळी दफन केलेल्या मोदी स्मशानभूमीत आले होते. त्यावेळी दफनविधी झालेल्या ठिकाणी फरशी बाजूला पडलेली होती. त्यावरील मातीही उकरलेल्या स्थितीत होती.बाळाच्या आजोबांनी खड्डा पूर्ण खोदून पाहिले असता, दफन केलेले बाळ जागेवर नव्हतेच, अशी माहिती वाघमारे कुटुंबीयांच्या सदस्यांनी दिली.
मोदी स्मशानभूमीत सुरक्षा रक्षकच नाहीत. आमचा कोणावर संशय नाही मात्र महापालिकेने या घडलेल्या प्रकाराचा गांभीर्याने विचार करून सुरक्षा रक्षक, कॅमेरे त्वरित लावावे, अशी मागणी वाघमारे कुटुंबीयांनी केली. ही घटना जादुटोणा अथवा अवयव काढण्यासाठी झाल्याची चर्चा होत आहे.