ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण यशामध्ये शाळा, महाविद्यालय, शिक्षकवृंद यांच्यासोबतच राज्य परिवहन महामंडळाचाही मोलाचा वाटा आहे. अत्यल्प दरात विद्यार्थ्यांना, तर मुलींच्या शिक्षणासाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून एसटीने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.त्यातच यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना एसटीचे पास थेट शाळा-महाविद्यालयांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
येत्या १८ जूनपासून राज्यात एसटी प्रशासनातर्फे ‘ एसटी पास थेट तुमच्या शाळेत ‘ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शाळा/महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटीचे मासिक पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबतच्या सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.
राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.