जागा वाटपावरून आघाडीत होणार मोठी चुरस!

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. सांगलीत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत उमेदवारीवरून बेबनाव झाला होता. आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवरही आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पावर पक्षात वाद हेवेदावे सुरू झाले आहेत. त्यातच ठाकरे गटानेही आघाडीत नवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे सांगलीत जागा वाटप करताना महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांची मोठी पंचायत होण्याची शक्यता आहे.

सांगली जिल्ह्यात खासदार विशाल पाटील यांनी विश्वाजीत कदम यांच्या उपस्थितीत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना विधानसभा निवडणुकीसाठी आव्हान दिले आहे. त्यामुळे महविकास आघाडीत घमासान होणार अशी शक्यता वर्तवली जात असतानाच ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांनीही तेल ओतले. त्यामुळे सांगलीत जागा वाटपावरून आघाडीत मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. यातून वरीष्ठ मंडळी कसा मार्ग काढणार याकडे लक्ष आहे.

विशाल पाटील यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर-वाळवा विधानसभा मतदारसंघाकडे आपले विशेष लक्ष असल्याचे विधान केले. त्याच स्टेजवर विश्वजीत कदम यांनीही जयंत पाटील यांना इशारा दिला आहे. परिणामी सांगलीतील विधानसभांच्या जागांवरुन काँग्रेस आणि शरद पवार गटात वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जाते. त्यात आता चंद्रहार पाटलांनीही दोन जागांवर दावा सांगितला आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीतील ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी विधानसभेत दोन जागा लढवणारच, अशी ठाम भूमिका मांडली आहे. खानापूर-मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणारच, असे त्यांनी स्पष्ट करून महाविकास आघाडीत नव्याने आव्हान निर्माण केले आहे.