इचलकरंजी शहरात आध्यात्मिक व भक्तिमय वातावरण तयार व्हावे, यासाठी महिलांसाठी हरिपाठ शाळा सुरू करणार आहे, अशी घोषणा आमदार प्रकाश आवाडे यांनी केली.
आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकरी पायी दिंड्यांना राज्य सरकारकडून प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार आवाडे यांचा वारकरी संप्रदायतर्फे सत्कार करण्यात आला. सदाशिव उपासे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते.
दोन वर्षांपूर्वी आमदार आवाडे यांच्या पुढाकाराने व वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजीत भव्य वारकरी दिंडी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. याप्रसंगी आमदार आवाडे यांच्याकडे राज्य सरकारने वारी दिंडीसाठी ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. त्याची आर्थिक तरतूद तत्काळ करण्याचे आदेश सचिवांना दिल्याची माहिती आमदार आवाडे यांनी दिली.