शैक्षणिक प्रवासाला मिळणार एसटीचे बळ

शाळा सुरू झाल्या की, विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती, सवलतींची माहिती दिली जाते. आतापर्यंत मात्र शाळा आणि विद्यार्थीही एसटी महामंडळाच्या विविध सवलतींच्या योजनांपासून दूरच राहिले आहेत. त्यामुळे यंदा इचलकरंजी एसटी आगाराच्यावतीने पास सवलतींसह अनेक सवलतींच्या योजनांचा शाळा शाळांत जागर केला जात आहे.

यातून नानाविध प्रवासाच्या योजना समजू लागल्या असून, यापुढे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला एसटीचे बळ मिळणार आहे.शाळा सुरू झाली की, ग्रामीण भागातून शहरात येणारे शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची मासिक पाससाठी गर्दी होत असते. पाचवी ते बारावीपर्यंत अहिल्याबाई होळकर ही विद्यार्थिनींसाठी मोफत पास योजना असल्याने यालाही चांगला प्रतिसाद मिळतो.

यापलीकडे जाऊन विद्यार्थी आणि शाळांपर्यंत एसटी महामंडळाच्या इतर प्रवासाच्या सवलतींची माहिती पोहोचली नव्हती आणि विद्यार्थ्यांनीही त्याबाबत अधिक जाणण्याचा प्रयत्नही केला नाही. यावर्षी याची गांभीर्याने नोंद घेत इचलकरंजी एसटी आगारातर्फे शाळा, महाविद्यालयांत विविध पास व सवलतींचा जागर केला जात आहे. याला प्रतिसाद मिळत आहे.