काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरेश हाळवणकर यांनी सर्वप्रथम कमळ फुलवले. त्यांच्या रूपाने कोल्हापूर जिल्ह्याला भाजपचा पहिला आमदार मिळाला. सलग दोन वेळा आमदार पदावर राहिलेल्या सुरेश हाळवणकर यांचा मागील निवडणुकीत पराभव झाला. प्रकाश आवाडे यांनी अपक्ष निवडून येत भाजपला साथ दिली. शहरातील हिंदुत्ववादी वातावरण बघून त्यांनी विविध आमिषांचा त्याग करून भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला. सुरेश हाळवणकर हे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असल्याने त्यांना उमेदवारी मिळणार हे नक्की होते. तसेच पक्षात सक्रिय असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी कार्यकर्त्यांतून चर्चा होती. मात्र ऐनवेळी पक्षाने राहुल आवाडे यांना उमेदवारी दिली. अचानक देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश हाळवणकर यांना मुंबईला बोलावून घेतले. राज्य पातळीवरील घटक पक्षाशी झालेला समझोता आणि जागा कोणती, कशी आहे याची माहिती दिली.
पक्षातील सर्व घडामोडी माहित असल्याने आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या सुरेश हाळवणकर यांनी पक्षाचा आदेश मानून आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांना पक्षात प्रवेश दिला. त्याबरोबर राहुल आवाडे यांच्या उमेदवारीला संमती दिली. राज्यात सत्ता येण्यासाठी एक-एक जागा महत्त्वाची असल्याने मोठ्या ताकदीने प्रचार करून निवडून आणले. या प्रचारा दरम्यान अनेक वेळा जातीचे राजकारण विरोधकांकडून करण्यात आले. मात्र सुरेश हाळवणकर यांनी पक्ष आणि देश याला प्राधान्य देत जोमाने काम केले.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये राहुल आवाडे यांच्या रूपाने तिसऱ्यांदा कमळ फुलवण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले असले तरी या यशामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याबरोबरच मंत्री पद देऊन महाराष्ट्र भाजपा त्यांचा गौरव करणार काय ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्ह्यातील भाजपच्या जेष्ठ नेत्यांमध्ये सुरेश हाळवणकर यांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्याची नस त्यांना माहीत आहे. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर सोडून गेल्यामुळे जिल्ह्यात दुसरा मोठा नेता नाही. गेल्या पाच वर्षात भाजपच्या कोणत्याही नेत्याला मंत्रीपद मिळालेले नाही. सुरेश हाळवणकर यांना संधी दिल्यास जिल्ह्यात भाजपची ताकद वाढेल, असे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.