सूत खरेदी फसवणूक प्रकरण: पियुष अग्रवालला ५ दिवसांची पोलीस कोठडी

सूत खरेदी-विक्री व्यवसायात १.२१ कोटीच्या फसवणुक प्रकरणातील पियुष अग्रवाल याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. येथील मनीषकुमार धुत यांचे क्रिशव फॅबटॅक्स नामक सूत खरेदी- विक्री व्यवसायाचे कार्यालय आहे. कागवाडे मळ्यातील मयुर अग्रवाल, वर्षा अग्रवाल, पंकज अग्रवाल, पियुष अग्रवाल, प्रविण अग्रवाल, दिशा अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी मयूर इंडस्ट्रिजच्या नावे संगनमत करत धुत यांच्याकडून ६ डिसेंबर २०२२ ते २९ डिसेंबर २०२२ या कालावधीत आरटीजीएसद्वारे सूत विक्रीची रक्कम घेतली.

मात्र, वारंवार विचारणा करुनही रक्कम परत मिळत नसल्याने धुत यांनी १ कोटी २१ लाख ४४ हजार रुपयांची फसवणुक प्रकरणी ७ जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी पंकज अग्रवाल याला अटक केली होती. तर ताब्यात घेतलेला पियुष हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेत होता. त्याला आज अटक केली. दरम्यान, न्यायालयाने या गुन्ह्यातील दिशा अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन मंजुर केला असून पोलीस शोध घेत असलेल्या मयुर, प्रविण, वर्षा आणि विशाल अग्रवाल यापैकी मयुर आणि प्रविण अग्रवाल यांचा अटकपूर्व जामिन फेटाळला आहे.