राज्यात पेट्रोल-डिझेलचा भाव घसरला….

राज्यातील जनतेला इंधनाच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण झाली आहे. काल अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित कर (VAT) कमी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरल्या आहेत. राज्यात पेट्रोल 65 पैशांनी तर डिझेल 2.60 पैशांनी प्रति लिटर स्वस्त झाले आहे. पेट्रोल-डिझेलवरील वॅटमध्ये यापूर्वी पण एकदा कपात करण्यात आली होती.

अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रात डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे वरुन २५ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे महाराष्ट्राती मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे ६५ पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे २ रुपये ७ पैसे प्रति लिटर स्वस्त होणार असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

या कर कपातीनंतर राज्यातील मुंबई शहरात पेट्रोल 103.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 91.67 रुपये प्रति लिटर झाली आहे. ठाणे शहरात पेट्रोलचे आताचे दर 103.57 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर डिझेलचा भाव प्रति लिटर 90.14 रुपये इतका झाला आहे.