सोलापुर जिल्ह्यातील 108 जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू…

शेतकऱ्यांना अद्याप दिवसा वीज मिळाली नसल्याने त्यांना आजही रात्रीच्या अंधारातच शेतात जावे लागत आहे. दुसरीकडे, सोलापूरकरांना चार-पाच दिवसांआड तेही कमी दाबाने पाणी मिळत असल्याने पावणेदोन लाखांपैकी सव्वालाख कुटुंबातील लोक इलेक्ट्रिक मोटारी लावूनच पाणी भरतात.

या दोन्ही जोखमीच्या कामी २५ महिन्यांत ६० पेक्षा अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. १ एप्रिल २०२२ ते मे २०२४ या काळात जिल्ह्यातील १०८ जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.संध्या पावसाळा सुरू असल्याने पाण्याची फार टंचाई शेतकऱ्यांना जाणवत नाही, पण पावसात वीज चालू-बंद करताना अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे, रात्रीच्या अंधारात पिकांना पाणी देतानाही अनेकांचा मृत्यू झाला आहे.

पाच-सहा दिवसांचे पाणी एकदम भरून ठेवण्याच्या घाईगडबडीत काही सोलापूरकरांना देखील जीव गमवावा लागल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे. मागील २५ महिन्यांतील १०८ मृतांमध्ये सर्वाधिक मृत्यू पंढरपूर (२९), सोलापूर ग्रामीण (३१) व सोलापूर शहर (२३) हे विभाग अव्वल असल्याचे महावितरणकडील आकडेवारीतून स्पष्ट होते