मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्या काठी महिलांना १ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. त्यासाठी २१ ते ६० वयोगटातील महिला (वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न मर्यादा) या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
त्यासाठी अर्ज करण्यास सोमवार पासून प्रारंभ झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास १४ लाख महिला योजनेच्या लाभार्थी होतील असा अंदाज आहे.
सर्व महिलांना योजनेच्या लाभासाठी अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला काढावा लागणार आहे. लाभार्थी महिलांना १५ दिवसात कधीही त्यांच्या गावातील महा- इ-सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येईल. या योजनेसाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला, वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा, अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे.
अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल, ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल अशा महिलांना या योजनेतून लाभ दिला जाणार आहे.