खानापूर-आटपाडी मतदारसंघात सर्वच पक्षांचे लक्ष! आमदारकीसाठी चुरस….

सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली असली तरी यावेळी खानापूर-आटपाडी या स्व. अनिल बाबर यांच्या मतदार संघात सर्वच पक्षांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. अनिलभाउंच्या निधनानंतर या मतदार संघावर प्रभुत्व राखण्यासाठी बाबर गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर ताकदीने मेदानात उतरले असून त्यांना यावेळी केवळ आणि केवळ जिंकण्याच्या जिद्दीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

काँग्रेसचे नेते आमदार डॉ.विश्‍वजित कदम यांनी जिल्ह्यात पाच आमदार निवडून आणण्याचा चंग बांधला असून या हेतूने या मतदार संघातून डॉ. जितेश कदम यांनी चाचपणी सुरू केली आहे.या मतदार संघामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर हेही आमदारकीसाठी नशिब अजमावण्याचा प्रयत्न करत असले तरी विटा परिसरातून अपेक्षित प्रतिसाद मिळेलच असे नाही.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर राजकीय ताकदही वाढविण्याचा प्रयत्न आटपाडी तालुकयात सुरू आहे. यामुळे या मतदार संघात खरी लढत बाबर विरूध्द पाटील अशीच होण्याची चिन्हे दिसत आहेत. उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते आणि लोकसभा निवडणूक लढविलेले पैलवान चंद्रहार पाटील हे दोघेही याच मतदार संघातील आहेत.

महायुतीमध्ये शिंदे शिवसेनेला आणि महाविकास आघाडीतून उबाठाला ही जागा अग्रहक्काने पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न होतील. यानंतर या मतदार संघातील चित्र स्पष्ट होणार असले तरी जागा वाटपापुर्वीच या मतदार संघातील बाबर- पाटील अशी लढत मतदारांनी गृहित धरली आहे.