सोलापूर,बार्शी कृषीसमितीच्या निवडणुकांमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला…..

सोलापूर जिल्ह्याशी संबंधित सोलापूरसह माढा आणि धाराशिव या तिन्ही लोकसभा जागांवर भाजपसह महायुतीचा दारूण पराभव झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. परंतु त्या अगोदर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख सत्ताकेंद्र असलेली सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिती आणि शेजारच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील बार्शी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिती भाजपचे आमदार विजय देशमुख तर बार्शी कृषिउत्पन्न बाजार समिती तेथील भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या ताब्यात असून ही दोन्ही महत्वाची सत्ताकेंद्रे राखण्याच्या दृष्टीने या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे .या पार्श्वभूमीवर मागील संचालक मंडळाच्या निवडणुकीत पुन्हा प्रस्थापितांचे वर्चस्व कायम राहिले असता नंतर काही महिन्यातच परिस्थितीनारूप बाजार समितीचे सभापतिपद आमदार विजय देशमुख यांच्याकडे चालत आले. पुढे योगायोगाने शासनाकडून कारवाईची चक्रेही थंडावली.

आमदार विजय देशमुख हे सभापती असताना बाजार समितीला कधी पावसाळा तर कधी दुष्काळाचे कारण देऊन शासनाने एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. सोलापूरप्रमाणे बार्शी कृषिउत्पन्न बाजार समितीलाही मुदतवाढ मिळाली होती.येत्या १४ जुलै रोजी सोलापूर व बार्शी बाजार समित्यांची मुदत संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने या दोन्ही बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया हाती घेऊन प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे. येत्या २४ जुलै अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.