T20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून टीम इंडिया आज मायदेशी परतली आहे. सकाळी 6 वाजता टीम इंडियाचं विशेष विमान दिल्लीत दाखल झालं. 29 जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने तब्बल 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघ आज (4 जुलै) भारतात परतला आहे. यावेळी टीम इंडियाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे.
टीम इंडिया सध्या दिल्लीतील आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये आहे. त्यानंतर भारतीय खेळाडू साधारण 11च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला जातील. त्यानंतर दुपारी 2 ते 3च्या सुमारास टीम इंडिया मुंबईत दाखल होईल. मुंबईत टीम इंडियाची विजयी यात्रा काढण्यात येणार आहे. टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवरही जाईल. याठिकाणी भारतीय संघाच्या स्वागतासाठी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
टीम इंडियाची मुंबईतील विजयी रॅली मोबाईलवर पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्सवर सायंकाळी 4 वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स 1, हिंदी 1, 3 आणि त्यांच्या YouTube चॅनेलवर प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे जे चाहते मुंबईत पोहचू शकणार नाही, त्यांना आता टीव्ही आणि मोबाईलद्वारे या विजयी रॅलीचा आनंद घेता येणार आहे.