शुबमन गिलची कर्णधार म्हणून विजयी सुरुवात!

गुजरात क्रिकेट टीमने 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या 17 व्या मोसमातील पाचव्या सामन्यात पराभूत केलं आहे. मुंबई इंडियन्सला 169 धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 162 धावांपर्यंतच मजल मारता आली. रोहित शर्मा आणि इमपॅक्ट प्लेअर डेवाल्ड ब्रेव्हिस या दोघांनी अनुक्रमे 43 आणि 46 धावा करुन मुंबईला विजयाच्या जवळ आणून ठेवण्यात हातभार लावला. 

मात्र हे दोघे आऊट झाल्यानंतर इतर फलंदाजांनी गुडघे टेकले. त्यामुळे मुंबई इंडियन्सला 2012 नंतर यंदाही आपल्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवण्यात अपयश आलं.रोहित शर्मा याच्यानंतर हार्दिक पंड्या याला मुंबईची कॅप्टन्सी मिळाली. त्यामुळे 2013 पासून मुंबईची सलामी सामन्यातील पराभवाची मालिका खंडीत करण्याचं आव्हान कॅप्टन हार्दिक पंड्या याच्यावर होतं. मात्र हार्दिकलाही ते आव्हान झेपलं नाही.

मुंबईला 20 व्या ओव्हरमध्ये 19 धावांची गरज असताना फक्त 13 धावाच करता आल्या. कॅप्टन हार्दिकने अखेरच्या ओव्हरमध्ये निर्णायक क्षणी आपली विकेट टाकली आणि गुजरातचा विजय पक्का झाला. शुबमन गिल याने गुजरातला कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात जिंकवलं. शुबमन विजयानंतर काय म्हणाला, हे आपण त्यानिमित्ताने जाणून घेऊयात.

शुबमन गिल काय म्हणाला?

“दव येत असताना मुलांनी उल्लेखनीय कामगिरी केली, ते अप्रतिम होतं. आमच्या फिरकीपटूंनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यामुळे आम्ही गेममध्ये कायम राहिलो. आम्हाला मुंबईवर फक्त दबाव वाढवायचा होता आणि त्यांच्याकडून चुका होण्याची वाट पाहायची होती”, असं शुबमन म्हणाला.