आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सांगली जिल्ह्याला निधी देताना शासनाकडून दुजाभाव केला जात आहे. याबद्दल खेद वाटतो, असे सांगत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगली जिल्ह्यातील अनेक ज्वलंत प्रश्न मांडले.विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा करताना डॉ. विश्वजित कदम बोलत होते. यावेळी डॉ. कदम म्हणाले, ताकारी म्हैसाळ योजनेसाठी ४५० कोटींची तरतूद केली. परंतु, आणखी वाढीव ३०० कोटींची तरतूद केली तर योजनेची रखडलेली कामे पूर्ण करता येतील.
टेंभू योजनेसाठी २०० कोटींची तरतूद केली आहे. मात्र टेंभू योजनेच्या अपूर्ण कामांच्या पूर्णत्वासाठी आणखी ४०० कोटींची गरज आहे.सांगली जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळी आहेत तर काही तालुके सधन आहेत. दुष्काळी जत तालुक्यात आजही अनेक ठिकाणी पाणीटंचाई भासत आहे. याचवेळी जिल्ह्यात उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती, पूर परिस्थितीवर योग्य त्या उपाययोजनांसाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली.
सांगली शहरातील शेरीनाला प्रकल्प निधीअभावी अपूर्ण आहे. या प्रकल्पासाठी १०० कोटींची गरज आहे.मिरज शहरातील भुयारी गटार योजनेसाठी २४ कोटींची तरतूद करावी. स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव असलेल्या देवराष्ट्रे गावासाठी जन्मशताब्दी वर्षात माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी २ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या गावासाठी आता १० कोटींच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी डॉ. विश्वजित कदम यांनी केली. यावेळी जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर त्यांनी विधिमंडळाचे लक्ष वेधले व जिल्ह्याबाबत दुजाभाव होतोय, असे सांगत सरकारवर जोरदार टीका केली.