सध्या दिवसभर ३३ ते ३४ अंश तापमान अन् ६७ टक्के आर्द्रता असे वातावरण आहे. अशात दुपारी असह्य उन्हाचा चटका बसत असताना गेले दोन ते तीन दिवस संध्याकाळी सात वाजल्यानंतर थंडीची जाणीव कोल्हापूरकरांना होऊ लागली आहे.
या वर्षी पावसाने दगा दिला, पण ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातच थंडी अवतरली.
२०१५ पासून हिवाळ्याचा कालावधी हा कोल्हापूर परिसराकरिता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू असताना, यंदा ऑक्टोबरमध्येच थंडी सुरू झाली आहे. अशातच दररोज पहाटे पाच ते सात वेळेत अनेक ठिकाणी धुक्याची दुलईसुद्धा पडलेली दिसते. संध्याकाळी सातनंतर थंडी सुरू होती.
थंडीचा हा कालावधी सकाळी सात ते आठपर्यंत असतो. मात्र दहानंतर तीव्र उन्हाचा चटका सुरू होती. या विचित्र वातावरणामुळे कणकण, डोकेदुखी, अंगदुखी, ताप, सर्दी, खोकल्याचे आजार वाढले आहेत.
‘ही थंडी पुढे तशीच राहील, याची नोंद हवामान खात्याने घेतलेली आहे. या वर्षी ऑक्टोबर हिटचा प्रभाव लवकर कमी झाला. त्यामुळे लवकर थंडी सुरू झाली. चार ते पाच दिवसांपूर्वी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला, पण कोल्हापूर परिसरात पाऊस झाला नाही. पाऊस येईल, असे वाटले होते. पाऊस कमी होणे, अचानक थंडी येणे हे सर्व घटक हवामान बदलांशी संबंधित आहेत.