पी. व्ही. सिंधू अन् ए. शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड….

आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी लंडन ऑलिम्पिकमधील कास्य पदक विजेता नेमबाज गगन नारंग यांची भारतीय संघाच्या मिशन प्रमुख म्हणून निवड झाली. गगन नारंगने यांनी दिग्गज बॉक्सर मेरीकोम हिची जागा घेतली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षा पी. टी. उषा यांनी याबाबत माहिती दिली.

पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि दिग्गज टेबल टेनिसपटू ए. शरथ कमल हे भारतीय संघाचे ध्वजवाहक असतील. मेरीकोमने भारताच्या मिशन प्रमुखपदाचा राजीनामा दिल्यानंतर मिशन उपप्रमुख नारंग याची मुख्य प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत, असेही पी. टी. उषा यांनी सांगितले.

पॅरिस ऑलिम्पिक खेळ 26 जुलैपासून सुरू होणार असून 11 ऑगस्ट रोजी संपणार आहेत. या खेळांमध्ये 196 देशांतील 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी ऑलिम्पिकमधील 28 खेळ तेच असतील ज्यांचा 2016 आणि 2020 च्या खेळांमध्ये समावेश करण्यात आला होता. पण स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाइंबिंग आणि सर्फिंग यासारखे काही नवीन खेळ ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहेत.

आत्तापर्यंत भारतातील एकूण 125 खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताचा हा सर्वात मोठा तुकडा असेल. यामध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा यांचाही समावेश आहे, ज्याने 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. आतापर्यंत, नेमबाजी, ऍथलेटिक्स, कुस्ती, बॉक्सिंग, तिरंदाजी, नौकानयन, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन यासह 16 खेळांमधील भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.

भारताने बहामास येथे होणाऱ्या जागतिक ॲथलेटिक्स रिले 2024 स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या संघात मुहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अमोज जेकब आणि राजेश रमेश यांचा समावेश आहे. क्रीडामंत्री मनसुख एल. मांडविया यांनी रविवारी पीटीआयला सांगितले की, मला पूर्ण विश्वास आहे की हा संघ एक विजयी होईल. भारतासाठी क्रीडा क्षेत्रात मोठे यश आल्याचे देखील मांडविया यांनी सांगितले. 1 ते 11 ऑगस्ट दरम्यान स्टेडियम डी फ्रान्स येथे होणाऱ्या ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेसाठी रवाना झालेल्या खेळाडूंच्या निरोप समारंभात ते बोलत होते.