उत्तराखंमध्ये मुसळधार पाऊस (Uttarakhand Rainfall) पडत आहे. या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. उत्तराखंडच्या जोशीमठजवळ दरड कोसळली होती. यामुळे बद्रीनाथ-जोशीमठ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक पर्यटक एकाच ठिकाणी अडकून राहिले आहेत.
यामध्ये कोल्हापूरमधील अनेक पर्यटकांचा समावेश आहे. या पर्यटकांना स्थानिक प्रशासनाकडून मदत केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील जोशीमठ येथे महामार्गावर दरड कोसळल्यामुळे ७ जुलैपासून अनेक पर्यटक अडकले आहेत. देशभरासह महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक जोशीमठ येथे अडकले आहेत.
या पर्यटकांमध्ये कोल्हापूरच्या पर्यटकांचाही समावेश आहे. बद्रीनाथ-जोशीमठ महामार्गावर वाहनांच्या तब्बल १० किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याची माहिती आहे. अडकलेल्या पर्यटकांना आर्मीकडून जेवणाची सोय केली जात आहे.अडकलेल्या सर्वच पर्यटकांची आर्मीकडून काळजी घेतली जात आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळली त्याठिकाणी मातीचा ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
तिसऱ्या दिवशीसुद्धा दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. एकाच ठिकाणी अडकल्यामुळे पर्यटकांचे हाल होत आहे. अजूनही २४ तासांहून अधिक वेळ दरड बाजूला करण्याचे काम सुरूच राहण्याची शक्यता आहे.