आ. शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्यास यश!

सांगोला तालुक्यातील सर्वाधिक महत्त्वकांक्षी ठरणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीसाठी आमदार शहाजीबापू पाटील यांचा राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता आणि या पाठपुराव्यास यश आले असून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव अरविंद मोरे यांनी याबाबतचा शासनादेश काढला आहे.

सांगोला शहरातील सांगोला ग्रामीण रुग्णालयाची श्रेणी वाढ करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सातत्याने गाठीभेटी घेऊन पाठपुरावा केला होता आणि या पाठपुराव्याला अखेरीस यश आले असून सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे 30 खाटांवरून 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक विशेष बाब म्हणून श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

सदर 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून तेथे बांधकाम व पदनिर्मिती करण्याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे. 25 सप्टेंबर 2019 मधील तरतुदीनुसार उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखडे सादर करण्यात येणार आहेत.