इचलकरंजी विधानसभा हा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये येतो. नुकतेच लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील माने यांनी विजय मिळविला. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि इचलकरंजी विधानसभेसाठी महायुतीत इच्छुकांची भाऊ गर्दी खूपच झालेली आहे. उमेदवारीसाठी इचलकरंजी विधानसभेमध्ये रस्सीखेच होण्याचे संकेत आहेत. महायुतीतून सुरेश हळवणकर, विठ्ठल चोपडे, रवींद्र माने हे इच्छुक आहेत. सुरेश हळवणकर हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी मध्यंतरी दिल्या आहेत.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जागा दिल्यास त्यांच्या नावाचा विचार पक्ष करणार का? हे देखील पाहणे उचित ठरणार आहे. तसेच शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांनीही शिरोळ तालुक्यात झालेल्या मेळाव्यात शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे माने हेही उमेदवारीची मागणी करू शकतील.
सध्या महायुतीला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हेही देखील महायुतीतून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी एका मेळाव्यात आपण कोणाच्याही दारात उमेदवारी मागण्यात जाणार नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे ते आपला शब्द बदलून पुन्हा महायुतीकडे उमेदवारी मागणार का आणि उमेदवारी मागितली तर ते भाजपाकडून मागणार की शिवसेनेकडून हेही पाहणे उचित ठरणार आहे. त्यामुळे एकंदरीतच महायुतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.