महाराष्ट्र शासनाने यंत्रमाग उद्योगासाठी जाहीर केलेली १ रुपये व ७५ पैशांची अतिरिक्त वीज दराची सवलत पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच गेल्या १५ मार्चपासून केली जाणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिल्याचे इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
याचबरोबर मल्टीपार्टी वीज कनेक्शन, यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ, साध्या यंत्रमागधारकांना ५ टक्के व शटललेस यंत्रमागधारकांना २ टक्के व्याज अनुदान, आदी प्रश्नांबाबत वस्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली आहे.
याबाबत लकवरच निर्णय होणार आहेत. त्यासाठीच १९ जुलैला सकाळी साडेअकरा वाजता केंद्र सरकारच्या वस्रोद्योग मंत्रालयामार्फत सर्व संघटना व यंत्रमागधारकांची बैठक पॉवरलूम असोसिएशनमध्ये आयोजित केली आहे. यामध्ये यंत्रमाग उद्योगाशी निगडीत डाटा कलेक्शनची माहिती दिली जाणार आहे.
याशिवाय साध्या यंत्रमाग उद्योजकांनी घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जावर ५ टक्के व शटललेस उद्योजकांनी उद्योगासाठी घेतलेल्या कर्जावर २ टक्के व्याज सवलत योजनेची माहिती देण्यासाठी शासनाच्या सोलापूर प्रादेशिक उपायुक्त यांच्यावतीने २४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे. यामध्ये व्याज सवलतीसंदर्भात लागणारी माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.