उद्या आषाढी एकादशीला घरबसल्या अशी करा विठ्ठलाची पूजा…

हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे. यंदा आषाढी एकादशी १७ जुलैला साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले असून आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत.

जो मिळेल त्या गाडीने, बसने पंढरपूरला जात आहे. मात्र काही जणांना इच्छा असूनही पंढरीला जाणं शक्य नसत. अशावेळी ज्या लोकांना आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता येत नाही ते लोक घरच्या घरी मनोभावे पूजा करू शकतात. त्यासाठी साहित्य काय लागते? शुभ मुहूर्त कोणता आहे आणि यासाठी विधी काय आहे तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आषाढी एकादशी तिथी

हिंदू पंचांगानुसार आषाढी शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 16 जुलैला रात्री 8.33 वाजेपासून 17 जुलै रात्री 9.33 वाजेपर्यंत आहे. उदय तिथीनुसार आषाढी एकादशी ही 17 जुलैला साजरी होणार आहे.

पूजेसाठी साहित्य

विठूरायाची पूजा करण्यासाठी तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, पंचामृत, पाणी, हळद कुंकू,अष्टगंध, बुक्का, नवीन वस्त्र, अगरबती , तांदूळ, सुपारी, केळी, 5 फळं, तुळशी पत्र, गुलाब फल, विडाचे पान इत्यादी साहित्य लागेल.

पूजा कशी करावी?

आषाढी एकादशीला उपवास करावा. सकाळी लवकर उठावे, स्नान करुन घरच्या देवाची पूजा करावी.विठूरायाच्या मूर्तीचे पंचामृताने स्नान घालावे. त्यानंतर मूर्तीला व्यवस्थित पुसून गुलाल किंवा बुक्का लावावा.विठुरायाला नवीन वस्त्र परिधान करा.यानंतर अबीर, गुलाल, तांदूळ, फुले आदी वस्तू अर्पण करा.उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवून विठ्ठलाची आरती करावी.