सांगली लोकसभेनंतर विधानसभा चर्चेत! उमेदवारीवरून वाद होणार की?

सांगली लोकसभा कोणाच्या वाट्याला जाणार यावरून चांगलीच चर्चा रंगली होती. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात शेवटपर्यंत रस्सीखेच सुरू होती. शेवटी ठाकरे गटाने ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली. पण त्याचा फारसा उपयोग ठाकरे गटाला झाला नाही. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी ही जागा दणदणीत मताधिक्याने जिंकली.

शिवाय सांगलीत काँग्रेसचीच ताकद असल्याचे दाखवून दिले. लोकसभा निवडणूक आता झाली आहे. सर्वांना विधानसभेचे वेध लागले आहेत. सांगली लोकसभेत काँग्रेसचे सर्वच नेते आणि कार्यकर्ते एकसंध पणे विशाल पाटील यांच्या मागे उभे राहीले. आता तेच नेते विधानसभेला पक्षाने आमच्या मागे उभे रहावे अशी आशा बाळगून आहेत.

त्यामुळे सांगली विधानसभेवर एका पेक्षा जास्त जणांनी दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेस समोर उमेदवारी देताना डोकेदुखी असणार आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

सांगली लोकसभेला विशाल पाटील व विधानसभेला पृथ्वीराज पाटील हे जवळपास ठरले होते. गेल्या वर्षभरापासून याची चर्चाही होती. जाहीर कार्यक्रमातून पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवाराबाबत काँग्रेस नेत्यांकडून संकेतही दिले जात होते.

मात्र, आता सांगली विधानसभा निवडणूक लढण्याची भूमिका जयश्रीताई पाटील यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सांगली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.