विठुरायाच्या नामघोषाने दुमदुमून गेली वस्त्रनगरी!

इचलकरंजी वस्रनगरीत पंढरपूरचा उत्सव साजरा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेषात आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत सजून शहरातून अनोखी दिंडी काढली. टाळ-मृदंगाच्या गजराने, फुगडीच्या फेराने आणि विविध वाद्यांच्या मधूर ध्वनीने अभंग व भजने गात पंढरपूर अवतरल्यासारखे वाटत असताना शहर विठ्ठलमय झाले होते.

शहरातील शाळांनी विद्यार्थ्यांच्या भक्‍तिभावात दिंडी काढली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पांढरे कपडे, पांढरी टोपी, हार-तुरे घालून, हातात टाळ-चिपळ्या घेऊन दिंडीत सहभाग घेतला. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत काही विद्यार्थी तर श्रीराम, श्रीकृष्णाच्या वेशातही काही विद्यार्थी होते.

शाळांतील विद्यार्थी शहरातील प्रमुख मार्ग, भागाभागांत एकत्र येऊन विठ्ठलाच्या भक्तीत रंगून गेले. दिंडीत विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. टाळ, मृदंग, हार्मोनियम यांसारख्या वाद्यांच्या साथीने भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित केला. विद्यार्थी दोघांच्या जोड्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून गोलाकार फिरत होते.

त्यांनी विविध गाण्यांच्या तालावर फुगडीचा फेर धरला आणि त्यामध्ये जोश भरत उत्सवात रंगत आणली.विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी हातात विविध घोषवाक्ये आणि संदेश असलेले फलक घेतले होते. विठू माऊली, विठ्ठलाचा जयजयकार, हरिभक्तांचा विजय असो, असे संदेश फलकांवर लिहिलेले होते.

तसेच पर्यावरणाचेण व शिक्षणाचे महत्त्व, नदी प्रदूषण आणि सामाजिक एकतेचे संदेश दिले होते. हे फलक त्यांनी वारकऱ्यांच्या शैलीत मिरवले आणि या उत्साहपूर्ण घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले होते.