इचलकरंजी मतदारसंघांत प्रतिष्ठेच्या लढती!

विधानसभा निवडणुकीची मंगळवारी घोषणा झाली. २२ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष रणधुमाळीला प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोण कोणाच्या विरोधात लढणार, मैदान कोण मारणार, छुपे रूस्तम कोण, याची उत्सुकता मतदारांना लागलेली आहे. इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत सध्या महायुतीकडून भाजपतर्फे राहुल आवाडे, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मदन कारंडे यांची उमेदवारी निश्‍चित समजली जात आहे. त्यामुळे सध्या तरी दुरंगी लढतीचे चित्र दिसत असले तरी महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे इच्छुकांची संख्या पाहता बंडखोरीची चिन्हे आहेत.

या सर्व घडामोडींमध्ये माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. तर चुरशीच्या लढतीची शक्यता असल्यामुळे स्थानिक पातळीवर मँचेस्टर आघाडीसह लहान-मोठ्या पक्षांना अधिक महत्त्व येण्याची शक्यता आहे.या मतदारसंघात गेल्या तीन लढती आमदार प्रकाश आवाडे विरुद्ध माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यात झाल्या. आता मात्र आवाडे यांच्या भाजप प्रवेशाने चित्र बदलले आहे. महायुतीतर्फे राहुल आवाडे यांची उमेदवारी निश्‍चित समजली जात आहे. तर हाळवणकर यांच्या उमेदवारीची शक्यता धूसर आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील मूळ भाजप गट आणि आवाडे यांच्यात मनोमिलन न झाल्यास निवडणुकीत आवाडे यांच्यासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख रवींद्र माने इच्छुक आहेत. परिणामी, त्यांची बंडखोरी महायुतीसाठी मोठे डोकेदुखी ठरू शकते.तर तिसरा घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनीही निवडणुकीची तयारी सुरू ठेवली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडून बालाजी उद्योग समूहाचे मदन कारंडे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे; पण आवाडे यांनी रामराम केल्यानंतर काँग्रेसचा प्रभाव मर्यादित राहिला आहे. त्यामुळे यावेळी हा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्याचे सांगण्यात येत आहे.

तर काँग्रेसनेही हा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. काँग्रेसकडून शहराध्यक्ष संजय कांबळे हे इच्छुक आहेत. सागर चाळके यांच्या नेतृत्वाखालील मँचेस्टर आघाडी सध्या महाविकास आघाडीमध्ये असली तरी त्यांची भूमिका पुढे कायम राहणार काय, हे पहावे लागणार आहे. गतवेळी चाळके गटाने आवाडे यांचा प्रचार केला होता. तर मदन कारंडे यांनीही गत निवडणुकीत आवाडे यांना पाठिंबा दिला होता. यावेळी मात्र ते आवाडे यांच्या विरोधातील संभाव्य उमेदवार आहेत.