आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच, विधानसभेच्या दृष्टीकोनातून समीकरणांची जुळवाजुळव करण्यासाठी सध्या सर्वच पक्षांच्या बैठकांचं सत्र पाहायला मिळतं. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळेल, असं सांगितलं जात आहे. मात्र, आता राज्याच्या निवडणुकीत एकसंघ राजकीय आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.
विधानसभा निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षांची एकसंघ राजकीय आघाडी मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. रिपब्लिकन पक्षांमधीलआठवले, गवई, कवाडे गट आता एकसंध निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्ह आहेत. एकीकृत रिपब्लिकन समितीच्या वतीनं प्रयत्न सुरू झाले आहेत. चर्चेत भाजपसोबत असलेला आठवलेंचा पक्षही सहभागी झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट, तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आंबेडकरी विचारसरणीच्या विविध संघटनांची मोट बांधून एकसंघ रिपब्लिकन आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. एकीकृत रिपब्लिकन समितीच्या वतीनं हे प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळत आहे. नुकतंच नागपुरात त्या संदर्भातील एक प्राथमिक बैठक पार पडली.