हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील सुरेश मगदूम आणि त्यांचे भाऊ सुनील मगदूम यांच्यात २००१ साली शेती आणि घराचे रजिस्टर वाटणी पत्र झाले होते. रजिस्टर वाटणी पत्राप्रमाणे नोंद होण्यासाठी हेरले तलाठी यांच्याकडे रीतसर अर्ज केला
होता. सुनील मगदूम यांची गाव चावडी कार्यालयात दररोजची उठबस असल्याने त्यांच्या दबावाला बळी पडून तत्कालीन तलाठी यांनी गट नंबर ७९७ सामायिक विहिरीचे क्षेत्र वगळून इतर नोंदी घातल्या आहेत. सामायिक विहिरीची नोंद व्हावी यासाठी सुरेश मगदूम यांनी २००१ पासून प्रयत्न सुरू केले आहेत.
याबाबत त्यांनी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांतधिकारी कार्यालय, हातकणंगले तहसीलदार कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे पण प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नसल्याने सुरेश मगदूम यांनी १८ जुलैपासून २८ जुलै पर्यंत दररोज हेरले ते हातकणंगले तहसील कार्यालय येथे उपोषण करणार आहेत.
न्याय न मिळाल्यास २९ जुलै ते ६ ऑगस्ट पर्यंत हेरले ते इचलकरंजी प्रांत कार्यालय असा १८ किलोमीटरचा प्रवास दररोज सकाळी चालत जाऊन प्रांत कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. याचीही दखल न घेतल्यास ७ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत रोज हेरले ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय असा पंधरा किलोमीटरचा प्रवास चालत जाऊन उपोषण करणार असून यातूनही न्याय न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, प्रांत कार्यालय, हातकणंगले तहसीलदार, हातकणंगले पोलीस ठाणे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. त्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. यावेळी त्यांना उपोषणाला बसण्यास मज्जाव करण्यात आला होता.