आजपासून ‘वंचित’ ची आरक्षण बचाव रॅली!

आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात सातत्याने तणाव वाढत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण हा महत्वाचा मुद्दा झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे. त्यांनी राज्य सरकारला आता 13 ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याची डेडलाईन दिली आहे. आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापलेले असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या लढाईत उडी घेतली आहे. आजपासून मुंबईतून त्यांची आरक्षण बचाव रॅलीला सुरुवात होत आहे.

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव रॅलीची सुरुवात दादर येथील चैत्यभूमीपासून सुरु होत आहे. ही रॅली राज्यातील अनेक जिल्ह्यातून जाणार आहे. मुंबईतून ही यात्रा पुणे येथील महात्मा फुले वाड्यात येईल. त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशीव, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना, बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून आरक्षण बचाव यात्रा जाणार आहे. ७ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोठी सभा होणार आहे. या ठिकाणी ही रॅली थांबणार आहे.

महाराष्ट्रात वनवा पेटू नये. महाराष्ट्र शांत रहावा. सलोखा टिकून रहावा या दृष्टिकोनातून आम्ही 25 तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा सुरू करत आहोत. उद्या चैत्यभूमीपासून ही यात्रा सुरू होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा होऊन या यात्रेची सांगता होणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.