‘विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात, धनगरी ढोल-कैताळांच्या निनादात आणि भंडाऱ्याच्या अखंड (birdev yatra) उधळणीत पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेस प्रारंभ झाला.
काल (बुधवार) सकाळी प्रथेपरंपरेनुसार विधिवत कार्यक्रमांना सुरुवात झाली.(birdev yatra) मानाच्या दुधारी तलवारींचे गावचावडीत पूजन करण्यात आले. या तलवारी मिरवणुकीने भानस मंदिर व ‘श्रीं’च्या मंदिरात पूजन करून फरांडेबाबांकडे मार्गस्थ करण्यात आल्या.
प्रकाश पाटील (काका), रणजित पाटील, जोशी, आवटे, गावडे, कुलकर्णी, चौगुले आदी मानकरी व धनगर समाज पंच मंडळींनी फरांडेबाबांना भेटून मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण स्वीकारून फरांडेबाबा मानाच्या दगडी गादीवरून उठले. फरांडेबाबांनी हेडाम नृत्य केले. यावेळी जमलेल्या लाखो भाविकांनी बाबांच्या अंगावर भंडारा, खारीक-खोबरे, बाळ लोकर यांची उधळण केली. टनाच्या प्रमाणात भंडारा उधळला गेल्याने सारा आसमंत जणू सोनेरीच झाला होता. फरांडेबाबानीं मंदिरात जाऊन ‘श्रीं’चे दर्शन घेतले व तिथे भाकणूक केली.
यात्रा परिसरात विविध दुकाने, खेळणी-पाळणे, आइस्क्रीम, भेळच्या गाड्या, इमिटेशन ज्वेलरीची दुकाने, मनोरंजनाचे खेळ या सर्वांनी लावलेल्या जाहिराती आणि गाण्यांनी यात्रा परिसर दुमदुमून गेला आहे. उबदार कपड्यांची दुकाने, भला मोठा घोंगडी बाजार, ढोल व ढोलांच्या कड्यांचा बाजार यांची लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. काल रात्रीपासून यात्रा परिसरात अनेक ठिकाणी भाविक धनगरी ओव्यांचे कार्यक्रम करीत आहेत.
तर फरांडेबाबांच्या गादीसमोर अनेक भक्तगण ढोल व कैताळांचा निनाद करीत होते. अनेक मानाच्या छत्र्या फिरवत फरांडेबाबांचे दर्शन घेऊन तिथेच फिरवल्या जात होत्या. पोलिसांकडून एकेरी वाहतूक मार्गाचा अवलंब केला होता. ३५० हून अधिक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. यात्रेची गर्दी व कार्यक्रम टिपण्यासाठी ३० हून अधिक ड्रोन कॅमेरे यात्रा परिसरावर फिरत होते. दरम्यान, यात्रेतील मुख्य कार्यक्रम आज झाला. यात्रेतील धार्मिक विधी अजून दोन दिवस चालणार आहेत.
फरांडेबाबांची भाकणूक …
- पर्जन्य : रोहिणीचा पाऊस चांगला होईल.
- राजकीय : राजकारणात प्रचंड अस्वस्थता होऊन राजकीय उलथापालथ होईल.
- बळीराजा : बळीराजास सुखाचे दिवस येतील.