कोल्हापूर: दारूसाठी पोटच्या पोरानं घोटला आईचा गळा

 दारूच्या व्यसनात गुरफटलेल्या तरुणाने आईचा खून केला. हा प्रकार काल (गुरुवार) वंदूर (ता. कागल) येथे घडला. दारूला पैसे न दिल्यावरून हा खून झाल्याचे कागल पोलिस ठाण्यात नोंद आहे. सुनीता अशोक वाईंगडे (वय ५१) असे तिचे नाव आहे.

पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करीत मुलगा नीलेश अशोक वाईंगडे (३०) याला अटक केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सुनीता वाईंगडे या नीलेशसह वंदूर येथील वाईंगडे मळ्यात राहत होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले.

आनंदाने घरात जाऊन पाहिले असता सुनीता जमिनीवर पडल्याचे दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. चेहरा सुजला होता. कानातून रक्तही आले होते. त्यामुळे आनंदा याने पोलिसांना कळविले. कागलचे पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार, उपनिरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक शैलजा पाटील यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सुनीता यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. मृतदेहाशेजारी दोरीही सापडली. सुनीता यांचा गळा आवळून त्यांचा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी मृतदेह कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

घटनास्थळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या तपास पथकाने भेट दिली. पोलिसांनी संशयावरून सुनीता यांचा मुलगा नीलेशला अटक केली. आपणच हा खून केल्याची माहिती त्यांने दिल्याचे पोलिसांतून सांगण्यात आले. नीलेशला दारूचे व्यसन असून, त्याचा अपघातही झाला होता. त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्याचे मानसिक संतुलनही बिघडले असल्याचे सांगण्यात आले. शवविच्छेदनानंतर खुनाबाबत अधिक तपशील मिळतील, असे तपास अधिकारी गजेंद्र लोहार यांनी सांगितले.