१ कोटी ९०लाखांचे सोने लंपास! विट्यात गुन्हा दाखल

बेळगाव येथून मुंबईतील सराफास देण्यास पाठविलेले १ कोटी ९० लाख ५० हजारांचे सोने परस्पर लंपास केल्याबद्दल संशयित सागर बाबासाहेब गुजले (वय ३२, रा. लेंगरे, ता. खानापूर) याच्याविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.नीलेश दिनकर जाधव (वय २७, रा. मेंगाणवाडी, ता. खानापूर) याने याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित सागर गुजले आणि फिर्यादी नीलेश जाधव हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. बेळगाव येथील सराफ कैलास गोरड यांच्या दुकानातील चोख सोने घेऊन ते मुंबईतील अक्षय शेटे यांच्या दुकाना द्यायचे तसेच तेथून सोन्याची साखळी घेऊन बेळगावला आणण्याचे काम दोघेजण करत होते.

२० डिसेंबर २०२३ रोजी नीलेश जाधव याने बेळगाव येथील गोरड यांच्या माउली बुलियन्स या दुकानातून तीन किलोचे सोने घेतले होते. हे सोने मुंबईत अक्षय शेटे यांच्या दुकानात द्यायचे होते. जाधव याने हे सोने दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता लेंगरे (ता. खानापूर) येथे जाऊन सागरकडे दिले. त्याला मुंबईत जाऊन हे साेने अक्षय शेटे याच्याकडे देण्यास सांगितले. परंतु सागर याने हे सोने मुंबईत पोहोच केले नाही. त्यानंतर जाधव याने वारंवार विचारणा करूनही सागर याने सोने परत केले नाही. त्यामुळे जाधव याने विटा पोलिस ठाण्यात त्याच्याविरूद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. विटा पोलिस अधिक तपास करत आहेत.