गुप्त बैठकांच्या चर्चेवर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य!

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी काही नेत्यांसोबत गुप्त बैठका घेतल्याच्या चर्चा आहे. या चर्चांबाबत प्रश्न विचारलं असता मनोज जरांगे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “राजकारणात काही गोष्टी उघड करायच्या नसतात”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. “कुणासोबत गुप्त बैठका आहेत ते नंतर जाहीर करु. सामाजिक न्यायासाठी ही राजकीय लढाई आहे. आम्हाला आरक्षण द्या. तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू”, असंदेखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मनोज जरांगे पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे जरांगे आता मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पण राज्य सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या तर आपला राजकारणाशी काही संबंध येणार नाही, असंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट म्हटलं आहे.

“राजकारणात काही गोष्टी उघड करायच्या नसतात. काही संकेत असतात ते पाळायचे असतात. राजकारणातला संकेत ज्याला कळतो तो यशस्वी होतो असं त्यामागील गमक आहे. त्यामुळे बैठक आहेत पण त्या कशाच्या आहेत ते आम्ही एक-दोन दिवसांनी जाहीर करणारच आहोत. सामाजिक न्यायासाठी ही राजकीय लढाई आहे. तिला नाईलाज आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“राजकारणातला गुप्तता हे मला चाब्र्यांनी शिकवलं. सत्ताधारी आणि विरोधक या चाब्र्या लोकांनी शिकवलं. आम्ही त्यांना वारंवार सांगत होती की, आम्हाला या लफड्यात नाही पडायचं. मी टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून आजही प्रामाणिकपणे सांगतो की, मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही. मी खरं ते सांगतोय. आमचं आम्हाला द्या. राजकारण तुम्हाला लखलाभ. मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. या शब्दाचा अर्थ सत्ताधारी तुम्ही समजून घ्या. अन्यथा तुमच्या हातात पश्चात्तापाशिवाय काहीच राहणार नाही”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.