आज दत्त जयंतीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ (Akkalkot Swami Samrtha) मंदिराचा दत्त जयंती उत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्ताचे अवतार मानल्या जातात त्यामुळे येथे दत्त जयंतीला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. दरवर्षी प्रमाणे यंदाही अक्कलकोट नगरीत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशासह राज्यातील विविध भागातील भाविक दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये आले आहेत.
भाविकांच्या गर्दीने गावाला जत्रेचे स्वरूप आले आहे.दत्त जयंती निमित्त स्वामींच्या मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी तब्बल 1 हजार 111 किलो फळांचा वापर करण्यात आला आहे.भाविकांची गर्दी पाहता वाहतूककोंडीची समस्या होऊ नये म्हणून ठीक ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कोरानाच्या नविन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मास्क वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. श्री दत्ताचा अवतार मानल्या जाणाऱ्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अगदी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या शिंगवे येथील एकमुखी दत्त जयंती यात्रा असते. या यात्रेला मोठ्या प्रमाणात यात्रेकरूंची गर्दी असते. तीन दिवस ही यात्रा सुरू असते. तर दुसरीकडे शिर्डीमध्येही दत्तजयंती व सलग सुट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी झाली आहे. सकाळपासून शिर्डीत भाविकांची मांदियाळी आहे. अनेक पायी पालख्या दत्त जयंती निमित्त शिर्डीत दाखल झाल्या आहेत. साईनामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदुमली आहे. दत्त जयंतीच्या निमित्तानं मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.