सोलापुरात बुधवारी पुन्हा मराठा आरक्षणाचे वादळ!

मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरवात सोलापूर शहरातून होणार आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होणार असून त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची सभा होणार आहे.

मनोज जरांगे-पाटील यांच्या शांतता रॅलीला मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. मराठा समाज ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्यात यावे, या मागणीवर ते ठाम असून, पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात करण्यात येत आहे.

यासाठी शुक्रवारी मनोज जरांगे-पाटील यांच्या शिष्टमंडळाने सोलापूर येथील सभास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या शिष्टमंडळात प्रदीप सांळुखे, किशोर कारट व इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर विचारपीठाचे पूजनही करण्यात आले.

सकल मराठा समाजाच्या ५८ शांतता मोर्चाचे निवेदन ज्याप्रमाणे केवळ लहान मुलींच्या हस्ते देण्यात येत होते, त्याप्रमाणे बुधवारच्या शांतता रॅलीतही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांऐवजी शेतकऱ्याच्या मुलीच्या हस्ते मनोज जरांगे-पाटील यांचे स्वागत करण्यात येणार आहे. सभेच्या वेळी विचारपीठावरही फक्त मनोज जरांगे-पाटील हे एकटेच असतील.