Madha Politics : चक्रव्यूहात अडकलेल्या बबनदादा शिंदेंनी फोडली कोंडी! तीनही बंधू आले एकत्र

सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चक्रव्यूहात सापडलेले आमदार बबनराव शिंदे यांना कोंडी फोडण्यात यश आले आहे.घरातील वाद मिटवून माढ्यातील शिंदे कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

माढा तालुक्यातील बारलोणी गावात झालेल्या मेळाव्यात आमदार संजय शिंदे, आमदार बबनराव शिंदे आणि रमेश शिंदे हे तीनही बंधू एकाच व्यासपीठावर आले होते. विशेष म्हणजे रमेश शिंदे यांनी घरातील वाद मिटवून बबनदादा शिंदे यांच्या पाठीशी उभी राहण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे माढ्याचे राजकारण पुन्हा एकदा रंजक बनले आहे.माढा विधानसभा निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांना घरातूनच आव्हान मिळाले होते, त्यांचे बंधू रमेश शिंदे यांचे चिरंजीव धनराज शिंदे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवली होती.

पवारांकडूनही धनराज शिंदे यांना ताकद देण्यात येत होती. आमदार बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी माढा तालुक्यात प्रचार दौरे हे सुरू केले होते. त्यांच्या सभांना तालुक्यातील युवा वर्गांचा प्रतिसादही उत्स्फूर्तपणे मिळत होता. मात्र, दुसरीकडे मुरब्बी राजकारणी बबनदादा शिंदे हे घरातील वाद मिटवण्यासाठी डावपेच टाकत होते. आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून हे तीनही शिंदे बंधू एकत्र आले आहेत‌.

घरातून आव्हान मिळालेल्या बबनदादा शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतील बदलते वारे पाहून काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही साथ सोडण्याचे जाहीर केले होते. आपल्या मुलाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली तर ठीक नाही; तर आम्ही मुलगा रणजितसिंह शिंदे यांना अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे एकीकडे पक्षीय राजकारणातून बाजूला गेलेले बबनदादांनी घरातील वाद मिटवून सर्वांना एकत्रित आणण्यात यश मिळवले आहे.